Ad will apear here
Next
वैशिष्ट्यपूर्ण व्हॅटिकन सिटी
जगातील सर्वांत लहान, पण महान देश
सेंट पीटर्स बाझिलिका

व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान देश आहे. रोमन कॅथॉलिक पंथाचे ते प्रमुख केंद्र आहे. त्याला दोन हजार वर्षांचा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. विश्वविख्यात कलाकारांनी तिथे भव्यदिव्य वास्तू निर्माण केलेल्या आहेत. ‘व्हॅटिकन सिटी’ला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली, त्याला फेब्रुवारी २०२०मध्ये ९१ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने, ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर ‘किमया’ सदरात लिहीत आहेत त्या देशाबद्दल...
..........
इटलीची राजधानी रोम हे पर्यटकांच्या आकर्षणाचे फार मोठे स्थान आहे. लाखो लोक दर वर्षी तिथे जातात. पुरेसा वेळ असेल, तर त्या शहराचाच एक भाग असलेल्या व्हॅटिकन सिटीला भेट देतात. ख्रिश्चन धर्मीयांचे जगातील प्रबळ असे हे केंद्रस्थान! त्यांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप तिथेच वास्तव्य करतात. ‘व्हॅटिकन सिटी’ला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली, त्याला फेब्रुवारी २०१९मध्ये ९० वर्षे पूर्ण झाली. डॅन ब्राऊन लिखित ‘एंजल्स अँड डेमन्स’ या चित्रपटात ‘व्हॅटिकन’चे सुंदर चित्रण बघायला मिळते. तेवढेच नाही, तर सुमारे ३३ चित्रपटांत त्या शहराचे दर्शन घडते. उदा. २०१२ (शीर्षक), दी अॅगनी अँड दी एक्स्टसी, दी कार्डिनल, एंड ऑफ डेज, गॉडफादर भाग ३, मादागास्कर ३, पोप जोन, दी पोप मस्ट डाय, स्पेक्टर, वुई हॅव ए पोप, दी व्हॅटिकन टेप्स इत्यादी इत्यादी.



युरोपमधील हा व्हॅटिकन देश टायबर नदीच्या किनारी, व्हॅटिकन पहाडावर वसलेला आहे. रोमन कॅथॉलिक पंथाचे ते प्रमुख केंद्र आहे. त्याला दोन हजार वर्षांचा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. विश्वविख्यात कलाकारांनी तिथे भव्यदिव्य वास्तू निर्माण केलेल्या आहेत. त्यात अनेक चर्चेस, कलात्मक प्रासाद, संग्रहालये आणि पुस्तकालये आहेत. या स्वतंत्र, पण लहानग्या देशाचे क्षेत्रफळ अवघे ४४ हेक्टर (१०९ एकर) आहे आणि लोकसंख्या फक्त एक हजार. अधिकृत भाषा इटालियन आणि लिपी इंग्रजीप्रमाणे रोमन आहे. सन १९३०मध्ये ‘पोप’नी तिथे आपले चलन जारी केले. आर्थिक व्यवहार ‘युरो’मध्ये चालतात. १९३२ साली शहरात रेल्वे स्टेशन निर्माण झाले. ११ फेब्रुवारी १९२९ रोजी व्हॅटिकन इटलीपासून वेगळा होऊन एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला.



इसवी सनाच्या आठव्या शतकात रोमच्या भोवताली असलेल्या प्रदेशांनी चर्चच्या शासनाचा स्वीकार केला. त्याला ‘पेपल स्टेट्स’ असे नाव होते. सन १८७०मध्ये इटलीने हे शासन आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे चर्च आणि इटलीत तणाव निर्माण झाला. रोमन कॅथॉलिक चर्च आपल्या सर्वोच्च धर्मगुरूला येशू ख्रिस्ताचा प्रतिनिधी मानत असे. कुठल्याही राज्याच्या अधिकाराखाली राहणे त्यांना मान्य नव्हते. म्हणूनच सन १९२९मध्ये दोघांच्यात समझोता होऊन, सेंट पीटर चर्चच्या लगतची १०९ एकर जागा त्यांना देऊन एका नव्या राष्ट्राची निर्मिती करण्यात आली. अशा रीतीने ‘व्हॅटिकन सिटी’ उदयास आली. तिथूनच जगभरातल्या सर्व कॅथॉलिक चर्चेसचे संचालन केले जाते. इसवी सन ३० ते ६४ या काळात ‘पोप’ म्हणून सेंट पीटरने कार्यभार चालवला. पीटर हा ख्रिस्ताच्या १२ शिष्यांपैकी एक आणि पहिला धर्मप्रसारक होता. सन ३२६ मध्ये, सम्राट कॉन्स्टन्टाइनने सेंट पीटरच्या समाधीवर अतिभव्य वास्तू (बाझिलिका) उभारली. एका लांब-रुंद दिवाणखान्यात दुतर्फा उंच खांबांची रांग आणि त्यावर अर्धवर्तुळाकार घुमट अशी त्याची रचना आहे. १६व्या शतकात तिथेच पुनर्बांधणी होऊन, ख्रिस्ती धर्मीयांची जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वास्तू बांधण्यात आली.



‘व्हॅटिकन’ने लोकांना उपयुक्त अशा स्वत:च्या यंत्रणा उभारलेल्या आहेत. टेलिफोन केंद्र, पोस्ट ऑफिस, रेडिओ, सार्वजनिक बागा, बँक व्यवस्था, औषधविक्री यांच्याबरोबर पोपच्या सुरक्षेसाठी खास दल उभारलेले आहे. अन्नधान्य, पाणी, वीज आणि गॅस या सगळ्या गोष्टी तिथे आयात कराव्या लागतात. आयात-निर्यातीवर किंवा उत्पन्नावर कुठलाही कर नाही. जगभरातील १३० कोटी रोमन कॅथॉलिक भक्तांकडून येणाऱ्या ऐच्छिक देणग्यांमधून राज्याचा सर्व खर्च चालतो. ठेवींवरील व्याज, तिकिटे आणि नाण्यांची विक्री, संग्रहालय प्रवेश शुल्क, ग्रंथ प्रकाशन यांमधूनही प्रचंड उत्पन्न होत असते. सन १९८०पासून तिथले सर्व आर्थिक व्यवहार लोकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केले जातात. सचिवालयाद्वारे पाच कार्डिनल (चर्चमधील अधिकारी) देशाचे सर्व व्यवस्थापन बघतात. बहुसंख्य रहिवासी हे स्त्री-पुरुष धर्मोपदेशकच आहेत. बाकीचे कार्यालयीन सेवक, व्यावसायिक आणि विविध सेवा पुरवणारे लोक तिथे राहतात. व्हॅटिकन राज्य ग्रंथालयात सुमारे दीड लाख दुर्मीळ हस्तलिखितांचा खजिना आहे. ख्रिस्तपूर्व आणि इसवी सनाच्या आरंभीच्या काळातील सुमारे १६ लाख छापील पुस्तके तिथे उपलब्ध आहेत. व्हॅटिकन स्वत:चे दैनिक (रोज) प्रसिद्ध करते. अत्याधुनिक छापखान्यांमधून भारतीय भाषांसहित ३० भाषांमधून पुस्तके आणि माहितीपत्रके छापली जातात. ‘बायबल’ हा जगातील सर्वाधिक खपाचा ग्रंथ आहे. रेडिओवरून ४० भाषांमधले कार्यक्रम सुरू असतात. स्वत:चे दूरदर्शन केंद्रही चालू आहे. १९८४ मध्ये ‘युनेस्को’ने ‘व्हॅटिकन सिटी’ला जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केले. धार्मिकदृष्ट्या पोप हा रोमचा बिशप असतो.

सेंट पीटरसन ६४मध्ये रोमच्या भीषण आगीत असंख्य ख्रिस्ती बांधव मृत्युमुखी पडले. सम्राट नीरोला ख्रिश्चन लोकांबद्दल विलक्षण राग होता. जिथे आग लागली त्याच ‘सर्कस’ भागात सेंट पीटरला क्रूसावर चढवण्यात आले, असे प्राचीन परंपरा सांगते. ‘व्हॅटिकन’च्या परिसरात इसवी सनापूर्वी फारशी वस्ती नव्हती; पण तो भाग पवित्र मानला जात असे. हळूहळू त्याचा विकास होत गेला. सुरुवातीला सुमारे एक हजार वर्षे पोपचे वास्तव्य रोमलगतच्या लॅटरन पॅलेसमध्ये असे. चौदाव्या शतकात तर पोप सुमारे ७० वर्षे पोप फ्रान्समधल्या ‘अॅविग्नन’ गावी राहत असत. १८७०नंतर ‘व्हॅटिकन’ हेच त्यांचे केंद्र झाले. त्या शहराच्या आतील कुठल्याही व्यवहारात (धार्मिक वा अन्य) इटलीने कधीही हस्तक्षेप केला नाही. १९२९मध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्याला मान्यता मिळाली, त्या वेळी इटलीचा भावी हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याने राजाच्या वतीने आणि ‘पोप पायस ११’तर्फे कार्डिनल सेक्रेटरी पिएत्रो गॅस्पारी याने ‘स्वातंत्र्या’च्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या देशाने ‘तटस्थ’ भूमिका घेतली. जर्मनीसह सर्व फौजांनी ‘व्हॅटिकन’चा आदर करून, तिथले काहीही उद्ध्वस्त केले नाही. युद्ध संपल्यानंतर सन १९४६मध्ये ‘पोप पायस १२’ने नव्या ३२ कार्डिनल्सची नियुक्ती केली.

पोप फ्रान्सिसइटलीतून आलेल्या प्रवाशांना पासपोर्टचे निर्बंध नाहीत. सेंट पीटर चौक आणि बाझिलिका, तसेच धार्मिक समारंभांमध्ये लोकांना मुक्त प्रवेश असतो. फक्त त्याआधी विनामूल्य असलेली तिकिटे घ्यावी लागतात. बागांमध्ये नियोजित भेटीद्वारे गटागटाने जाता येते. तिथले हवामान रोमप्रमाणेच असते. ऑक्टोबर ते मेच्या मध्यापर्यंत, हिवाळ्यात अधूनमधून पाऊस पडतो. मे ते सप्टेंबर हवामान गरम, पण कोरडे असते. दव आणि धुक्याचेही अस्तित्व असते. महिन्यातील सूर्यप्रकाशाचे सरासरी तास ११० (डिसें.) ते ३३० (जुलै) असतात.

शहराचा अर्धाअधिक भाग (५७ एकर) बागांनी व्यापलेला आहे. कारंजी आणि सुंदर मूर्ती व पुतळ्यांमुळे त्यांची शोभा वाढलेली आहे. पश्चिम आणि दक्षिण-उत्तर उंच दगडी भिंती उभारलेल्या आहेत. राजसत्तेप्रमाणेच, पोपच्या आधिपत्याखाली राजकीय, व्यवस्थापकीय, कायदा-सुव्यवस्था यांचा कारभार चालतो. ‘व्हॅटिकन’ संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य नाही. सध्या कॅथॉलिक चर्चचे आणि ‘व्हॅटिकन’ देशाचे प्रमुख ‘पोप फ्रान्सिस’ (जन्म १७ डिसेंबर १९३६) हे आहेत.

‘व्हॅटिकन’ इटलीमध्ये स्थित असल्यामुळे इटालियन लष्करातर्फे त्या देशाला संरक्षण पुरवण्यात येते. तसा करार मात्र झालेला नाही. त्या छोट्या देशाकडे स्वत:चे सैन्य नाही. पोपच्या सुरक्षेसाठी ‘स्विस गार्ड’ जबाबदार आहेत. इतर देशांशी राजनैतिक संबंध ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. स्वत: पोप गरजेनुसार ते काम पाहतात. अपुऱ्या जागेमुळे ‘व्हॅटिकन’मध्ये कुठलीही वकिलात नाही. रोम शहरात सगळ्या वकिलाती आहेत. देशात दोन हजार नोकरदार लोक आहेत. ते सगळे तिथे राहत नाहीत (रोम किंवा जवळपासच्या गावात राहतात). लॅटिनचा वापर होतो; पण राजभाषा इटालियन हीच आहे. शहराच्या अधिकृत वेबसाइटमध्ये इटालियन, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिश भाषांचा समावेश आहे. पोपच्या सेवेत कुठल्या ना कुठल्या प्रकारे रुजू असलेल्या लोकांना नागरिकत्व मिळू शकते; परंतु त्यावर मर्यादा आहे. नोकरी संपताच नागरिकत्व रद्द होते.



जगातील सर्व राष्ट्रांपेक्षा ‘व्हॅटिकन’मध्ये जास्त वाइन रिचवली जाते. एका वर्षात प्रत्येक रहिवासी किमान १०५ बाटल्या वाइन पितो. ‘व्हॅटिकन’ हे कलेचे माहेरघर आहे. सेंट पीटर बाझिलिका उभारण्यात एकाहून एक जगप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ सहभागी झाले. ब्रामांट, मायकलेंजलो, ज्याकोमो डेल पोर्ता आणि बर्निनी यांनी मध्ययुगीन वास्तुकलेचे आदर्श निर्माण केले. ‘सिस्टीन चॅपेल’ हे भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. तिथले छत आणि ‘लास्ट जजमेंट’ यांचा निर्माता मायकलेंजलोच आहे. त्याचे विविध कलांमधील कर्तृत्व इतके अजोड आहे, की त्याचा स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. लाकूड, दगड, धातू या माध्यमांमधून त्याने सुंदर कलाकृती बनवल्या आहेत.

मायकलेंजलो‘सिटी चँपियनशिप’साठी फुटबॉलचे सामने आयोजित केले जातात. हा देश साधारण १.०५ किलोमीटर लांब आणि ०.८५ किलोमीटर रुंद आहे; पण तिथली वाहतूक व्यवस्था आधुनिक आहे. विमानतळ किंवा महामार्ग नाहीतच. फक्त हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड आहे. रेल्वेमार्ग आहे, पण तो मुख्यत: सामान वाहतुकीसाठी. रोमच्या सेंट पीटर स्टेशनपर्यंत तो गेलेला आहे. सगळ्यात जवळचे मेट्रो स्टेशन ‘सॅन पिएत्रो व्हेटिकानी’ हे आहे. शहराची स्वत:ची ब्रॉडबँड इंटरनेट व्यवस्था आहे. तिथले गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प आहे. पर्स हिसकावणे, खिसे कापणे आणि दुकानातील वस्तू चोरणे, हे प्रकार बाहेरून आलेल्या लोकांकडूनच घडतात. सेंट पीटर चौकात चालणाऱ्यांची संख्या इतकी प्रचंड असते, की तिथेच चोर ‘हातचलाखी’ दाखवतात. गुन्हेगार सापडलाच, तर इटालियन पोलिसांकडून खटला चालवण्यात येतो. ‘व्हॅटिकन’मध्ये तुरुंग नाही. तात्पुरत्या स्थानबद्धतेसाठी काही कोठड्या आहेत.

व्हॅटिकन सिटीचा ध्वजजगात १२ लाख कॅथॉलिक चर्चेस आहेत. त्यांचे नियोजन, संचालन, मार्गदर्शन, ‘व्हॅटिकन सिटी’मधून चालते. या छोट्या देशाचा वार्षिक अर्थसंकल्प अवघ्या ३५ कोटी डॉलर्सचा असतो... ‘हार्वर्ड’सारख्या एखाद्या मोठ्या विद्यापीठाच्या खर्चाहूनही कमी! ख्रिस्ती धर्मीयांमध्ये असा प्रघात आहे, की वार्षिक उत्पन्नाच्या ठराविक टक्के रक्कम नियमितपणे चर्चला द्यायची. जगभरातून अशा रीतीने स्थानिक चर्चेसमार्फत ‘व्हॅटिकन’पर्यंत अब्जावधी डॉलर्स देणगीरूपाने जमा होतात. त्याचा विनियोग - शिक्षण, आरोग्यसेवा, नवी बांधकामे, धर्मप्रसार, सेवकांना प्रशिक्षण आदी गोष्टींवर केला जातो. धार्मिक सत्तेबरोबरच ‘व्हॅटिकन’ची आर्थिक सुबत्ताही कल्पनातीत आहे.

येशू ख्रिस्त आणि बायबलच्या शिकवणुकीचा केवढा हा प्रभाव आणि अवघे भूमंडळ व्यापणारा त्यांचा विस्तार! 

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZPZBY
 For hundreds of years , Vatican exercised immense politicaal
power . Some of it -- directly ; some indirectly , by its hold through
religion . It was actively engaged in some wars in Europe .
Similar Posts
रोमचा अग्निप्रलय इसवी सनाच्या पहिल्या शतकात, १९ जुलै ६४ रोजी अज्ञात कारणामुळे इटलीतील रोममध्ये आग भडकते. संपूर्ण शहर बेचिराख करूनच ती शांत होते. एकीकडे राजधानी जळत आहे आणि त्या देशाचा सम्राट नीरो मजेत फिडल वाजवत बसला आहे, ही कथा आपण ऐकून आहोत; पण प्रत्यक्षात तिथं नेमकं काय घडलं होतं?... जाणून घेऊ या ज्येष्ठ लेखक रवींद्र
ज्वालामुखीमुळे काही क्षणांत जमिनीत गडप झालेले इटलीतील शहर - पॉम्पे २४ ऑगस्ट इसवी सन ७९ या दिवशी इटलीतील समृद्ध असे पॉम्पे शहर नजीकच्या ‘व्हेसुव्हियस’ पर्वतामधील निद्रिस्त ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने अल्पावधीत अतितप्त राखेखाली गडप झाले. किमान दहा हजार लोक क्षणार्धात मृत्युमुखी पडले. त्या वेळची शहराची स्थिती तब्बल १५०० वर्षे जमिनीखाली टिकून होती. त्यानंतर झालेल्या उत्खननातून अनेक गोष्टींचा उलगडा झाला
पुरातत्त्व अभ्यासकांना खुणावणारे इटलीतील उत्खनित नगर : पॉम्पे इटलीतील एके काळचे उत्साही पॉम्पे शहर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हा हा म्हणता पृथ्वीच्या चेहऱ्यावरून अदृश्य झाले, विस्मृतीच्या गर्तेत जाऊन पडले आणि १८व्या शतकातील उत्खननानंतर ते पुन्हा ‘प्रकट’ झाले. दोन हजार वर्षे ते जमिनीखाली जसेच्या तसे टिकून होते. ‘किमया’ सदरात आज ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांच्या लेखाचा उत्तरार्ध
पुण्यातील जुनी चित्रपटगृहे नुसत्या आठवणींनी गतकाळात नेणाऱ्या पुण्यातील जुन्या चित्रपटगृहांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language